आशियातील सर्वात मोठ्या कांदा मार्केटचे काम ठप्प, शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध

महाराष्ट्रातील नाशिकमधील लासलगाव एपीएमसी येथील कांद्याच्या घाऊक किंमतीमुळे शेतकऱ्यांनी आज लिलाव थांबवले. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघानेही सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केले. घाऊक बाजारात कांदा १ ते २ रुपये प्रति किलोना खरेदी केला जात आहे.

आशियातील सर्वात मोठ्या कांदा मार्केटचे काम ठप्प, शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध

नाशिक - महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य भाव न मिळाल्याने आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या नाशिकमधील लासलगाव मंडईत काम बंद पाडले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याने सांगितले की, आम्हाला आमच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, याच्या निषेधार्थ आम्ही बाजारात बोली लावणे बंद केले आहे. सरकारने आम्हाला मदत करावी. कांदा उत्पादक संघटनेच्या म्हणण्यानुसार त्यांची किंमत सरासरी १ ते २ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील नाशिकमधील लासलगाव एपीएमसी येथील कांद्याच्या घाऊक किंमतीमुळे शेतकऱ्यांनी आज लिलाव थांबवले. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघानेही सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कांद्याच्या भावात वाढ करण्याची मागणी करत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेधही केला.

एका शेतकऱ्याने सांगितले की, आम्हाला कांदा पिकवण्यासाठी एकरी 50,000 रुपये खर्च येतो, तर विक्री केलेल्या उत्पादनातून आम्हाला फक्त 10,000-20,000 रुपये मिळतात. आपण आत्महत्येचा विचार करत आहोत अशी स्थिती आली आहे. मोदी सरकारने आम्हाला मदत करावी, असे एका शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, यावर्षी केवळ महाराष्ट्रच नाही तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातही कांद्याचे बंपर उत्पादन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याची इतर राज्यांतील मागणी पूर्वीच्या तुलनेत आता कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे. परिस्थिती अशी आहे की, शेतकऱ्यांना कुठे 1 रुपये तर कुठे 2 रुपये किलो दराने कांदा विकावा लागत आहे. जे खर्चापेक्षा खूपच कमी आहे. कांदा उत्पादक संघटनेच्या म्हणण्यानुसार त्यांची किंमत सरासरी १ ते २ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील वणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी-सुरत महामार्गावर आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी कांदे, द्राक्ष रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. सरकारला जर लोकशाही मार्गाची भाषा समजत नसेल तर अधिवेशनादरम्यान विधानभवनावर कांदे, द्राक्ष आणि जिल्हा बँकेच्या नोटीसा फेकू असा इशारा संदीप जगताप यांनी दिला. तर आज लासलगावमध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकार, तसेच नाफेडच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत असल्याने राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव रोखून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.