राम मंदिरात महर्षी वाल्मीकी यांची प्रतिमा स्थापित

राम मंदिरात महर्षी वाल्मीकी यांची प्रतिमा स्थापित
पिंपरी (प्रबोधन न्यूज )  -  रहाटणी (पिंपरी) येथील राजवाडे राम मंदिरात शुक्रवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी रामायणाचे रचियते महर्षी वाल्मीकी यांची प्रतिमा स्थापित करण्यात आली. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त हरीश राजवाडे, सामाजिक कार्यकर्ते राजेश बडगुजर, संस्कार भारतीचे सचिन काळभोर, समरसता गतिविधीचे महेंद्र बोरकर, सुहास घुमरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रताप जाधव, महर्षी वाल्मीकी समाज प्रतिनिधी धनपत बेहनवाल, योगेश रेणवा यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी मनोगत व्यक्त करताना राजेश बडगुजर यांनी, "भारतीय संस्कृतीत प्रभू श्रीरामचंद्र यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. महर्षी वाल्मीकी यांनी रचलेल्या 'रामायण' या महाकाव्यामुळे जनमानसात श्रीराम यांची भगवान म्हणून पूजा करण्यात येते. आज महर्षी वाल्मीकी यांची प्रतिमा स्थापित करून त्यांच्या महान कार्याची उचित दखल घेतली गेली!" असे विचार मांडले; तसेच उपस्थितांच्या मनोगतातून 
महर्षी वाल्मीकी यांच्या महान कार्याचे स्मरण राहावे यासाठी सर्व राम मंदिरांत अशाप्रकारे महर्षी वाल्मीकी प्रतिमा, मूर्ती स्थापित करण्यात यावी. तसेच सर्व राम मंदिरांमध्ये महर्षी वाल्मीकी जयंती साजरी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
प्रतिमापूजनानंतर संस्कार भारतीच्या वतीने सुश्राव्य भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले.